Vote For OPS चे देशभर शंखनाद घुमनार, पेन्शन द्या समर्थन घ्या !
◼️जुन्या पेंशन मागणीचे निवेदन
प्रहार टाईम्स
देवरी ◼️जुनी पेंशन योजना मागणी संदर्भातचे निवेदन आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना देवरी जिल्हा गोंदियाच्या वतीने देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील दि. 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना म.ना.से.अधि. 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना बंद केल्यामुळे, कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्याविषयी प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी ही कर्मचाऱ्यांची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी आहे. मागील अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन मागणीसाठी अनेक धरणे आंदोलने, निदर्शने, मोर्चे इतकेच नव्हे तर आत्मक्लेशाचे पदयात्रा आंदोलन, मुंडण आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, जल समर्पण आंदोलन असे अनेक आंदोलने केली आणि शेवटी नाईलाजाने बेमुदत संप करून शासनाला जुन्या पेन्शनच्या मागणीची तीव्रता लक्षात आणून दिली. मात्र शासन कोणातेही असो वेळोवेळी फक्त खोटे आश्वासन देण्या शिवाय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या मागणीकडे कायम दुर्लक्षच करत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी आणि त्यांचे आप्तगण सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी जनप्रतिनिधींना विधिमंडळात पाठवितात मात्र त्यांनाचं सामान्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात काही रस नसेल तर अश्या लोकप्रतिनिधींना विधिमंडळात का पाठवावे? असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांनी जे लोकप्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करतील त्यांनाच समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यात VoteforOPS मोहीम राबविली जाणार आहे.
या संदर्भाचे निवेदन आमदार कोरोटे यांना देण्यात आले.
यावेळी येत्या हिवाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायरीवर एकच मिशन जुनी पेन्शनचा फलक घेऊन आंदोलन करणार, असे आमदार कोरोटे यांनी आश्वासन दिले.
निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे पदाधिकारी प्रविण सरगर, सदाशिव पाटील, विलास लंजे, सौ.रीता वंजारी, राजेश रामटेके,सुजित बोरकर,पंकज राठोड, यशवंत टेंभुर्णे, प्रकाश गावडकर, नरेश रामटेके, राजकुमार बारसे, सचिन सांगळे, रंजित धानगाये, संजय पंचभाई, रोशन कऱ्हाडे तसेच संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.