देवरी 🚨 विद्यार्थिनीवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, मुलींची सुरक्षा ऐरणीवर ?

◼️महामार्गावर रस्ता ओलांडताना विद्यार्थी असुरक्षित

◼️विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न

◼️देवरी येथील कारगील चौकातील घटना

देवरी◼️ तालुक्यातील नामांकित शाळेत दहाव्या वर्गात शिकणाऱ्या बसनी बाहेरगावाहून येणाऱ्या एका शाळकरी विद्यार्थिनीवर ३ अज्ञात दुचाकी स्वार युवकांनी चाकूने प्राणघाक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थिनीच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनी थोडक्यात बचावली आहे.

सदर घटनेमुळे विद्यार्थी सुरक्षा ऐरणीवर आली असून पालकांची चिंता वाढलेली आहे. प्राप्त माहितीनुसार देवरीपासून १० किमी. अंतरावरून देवरी येथे बसने येणारी व १० व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी गुरुवारी गावावरून येताना तिची दररोजची बस सुटल्याने ती दुसऱ्या बसने एकटी देवरीला पोहचली. ती आमगाव चौकात उतरल्यावर सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान एकटीच शाळेकडे पायी निघाली. दरम्यान ती कारगिल चौक ते चिचगड रोडकडे जात असताना ३ दुचाकीस्वार अज्ञात युवकांनी तिचा पाठलाग करीत तिच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

दुचाकी स्वार तिन्ही युवक तोंडाला मास्क बांधून असल्यामुळे विद्यार्थिनी त्यांना ओळखू शकली नाही. शाळेत गेल्यावर तिने सर्व प्रकार शाळेतील वर्ग शिक्षकांना सांगितला. वर्ग शिक्षकांनी प्राचार्याकडे तक्रार केली. प्राचार्याने संध्याकाळी सुट्टी झाल्यावर चार वाजता तीन शिक्षकांची ड्युटी बस स्थानकावर लावली. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर पोलिसांनी त्या तीन युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान विद्यार्थिनीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी गुरुवारी सायंकाळी उशीरा देवरी पोलिस स्टेशन गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास देवरी पोलिस करीत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share