कारमध्येच मुक्काम ठोकणारा मोस्ट वॉण्टेड चोर अखेर गोंदिया पोलिसांच्या जाळ्यात
◼️देवरी व डुग्गीपार पोलिसांच्या रडारवर असलेला चोर सापडला
गोंदिया◼️नागपूर चोरट्यांच्या जगतातील स्वतःला महागुरू समजतो. पोलिसांच्या नाकावर टिचून एकामागून एक घरफोड्याही करतो. गेल्या दोन महिन्यांत त्याने तब्बल दोन डझन चोऱ्या आणि घरफोड्या केल्या. घरी न राहता कारमध्येच त्याचा मुक्काम. कारचे स्टेअरिंगही तो कधीच सोडत नाही. वेगावरही त्याचे तेवढेच नियंत्रण. मात्र ‘पुलिस के हाथ लंबे होते हैं’ हे तो विसरला अन् अखेर नागपुरातील मोस्ट वॉण्टेड थिफ’ गोंदिया पोलिसांच्या हाती लागला. नरेश महिलांगे, असे या कुख्यात घरफोड्याचे नाव आहे.
नागपूर (लकडगंज, पाचपावली), देवरी व डुग्गीपार पोलिसांना घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेल्या अट्टल गुन्हेगाराला साथीदारासह जिल्हा पोलिसांनी शहरातील कुडवा परिसरात 26 जून रोजी अटक केली. त्याच्याजवळून चोरीची क्रेटा गाडी व 3 लाख 25 हजार रुपये जप्त करण्यात आले. नरेश अंकालू महीलांगे (26 रा.कळमना) व दीपक चंदू बघेले (22, रा. पिपरीया, छत्तीसगड) अशी आरोपींची नावे आहेत.
सडक अर्जुनी येथे 25 मार्च रोजी जिल्हा सहकारी बँकेचा चॅनल दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच 26 जून रोजी देवरी येथील श्रेय नरेंद्रकुमार जैन यांच्या महावीर राइस मिलमधून 4 लाख 38 रुपये रूपये आणि देवरी तालुक्यातीलच नवाटोला येथील यादोराव नरसय्या पंचमवार यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख असा 62 हजाराचा मुद्देमाल चोरी झाला होता. याप्रकरणी देवरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान दोन्ही प्रकरणाच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे 28 मार्च रोजी प्रदीप उर्फ दादू देवधर ठाकूर (30, रा. वारभाट छत्तीसगड) याला अटक करुन त्याच्याजवळून गुन्ह्यातील 3 लाख 47 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्याच्याकडून चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीत घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार नरेश महिलांगे याचे नाव समोर आले. तसेच नागपूर येथे लकडगंज पोलिस ठाण्यातंर्गत दीड कोटीची घरफोडी व पाचपाचली पोलिस ठाण्यातंर्गत क्रेटा गाडी व रोख पळविल्याच्या प्रकरणात पाचपावली पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस पथक आरोपीचा शोध घेत असताना सपोनि पोपट टिळेकर यांना नागपूरच्या गुन्ह्यातील चोरलेली क्रेटा गाडी कुडवा असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने घटनास्थळ गाठून नरेश महिलांगे व त्याचा साथीदार दीपक बघेले याला ताब्यात घेतले. त्यांनी देवरी, सडक अर्जुनी व नागपूर येथे गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याजवळून देवरी येथील गुन्ह्यातील रोख 2 लाख रूपये, लकडगंज येथील गुन्ह्यातील 1 लाख 25 हजार तसेच पाचपावली गुन्ह्यातील 16 लाख किमतीची क्रेटा गाडी जप्त करण्यात आले. नरेश महिलांगे याला देवरी पोलिसांना तर दीपक बघेले याला पाचपावली पोलिसांचे मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले. मुद्देमालासह स्वाधिन करण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दिनेश लबडे, संदेश केंजले, सपोनि पोपट टिळेकर, विजय शिंदे, पोउपनि विघ्नें, पाटील, सफौ कावळे, पोहवा मिश्रा, मेहर, देशमुख, कोडापे, हलमारे, लुटे, भेलावे, बिसेन, शेख, तुरकर, ठाकरे, पटले, पोशि केदार, रहांगडाले, भांडारकर, गौतम, पांडे, यांनी तसेच पोलीस ठाणे रामनगर, रावणवाडी, गंगाझरी पोलीस पथकाने केली.
नरेश महिलांगे हा अत्यंत सराईत आरोपी असून त्याने नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात घरफोड्या करुन धुमाकूळ घातला असून छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातील इतर जिल्ह्यात मोठ्या रकमेच्या घरफोड्या, चोर्या, दुचाकी व मोठी वाहने चोरी केल्या असून त्यावर 50 च्यावर गुन्ह्याची नोंद आहे.
■ साहब पिक्चर में नहीं रहेंगे तो… महिलांगे याला दारू व एमडीचे व्यसन आहे. हे व्यसन भागविण्यासाठी तो घरफोड्या करतो. त्याला जिवाचीही भीती आहे. त्यामुळेच तो घरफोडीसाठी वेळोवेळी साथीदार बदलतो. घरफोडी अथवा चोरी करताना सीसीटीव्ही दिसल्यास तो मुद्दाम त्यात आपला चेहरा यावा यासाठी प्रयत्न करतो. याबाबत तो म्हणतो, ‘साहब पिक्चर में नहीं रहेंगे तो अपुनको पहेचानेगा कोण?