जिल्हा परिषद 220 शिक्षक स्वयंसेवकांची करणार भरती

गोंदिया◼️ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे शासन पातळीवरून भरली नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यादृष्टीने 1500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांतील शाळेत आता जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक स्वयंसेवक निवडण्याच्या निर्णयाला आज, 5 जून रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

विशेष म्हणजे शिक्षकांची कमतरता भागविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या धर्तीवर प्रत्येक पंचायत समितीने प्रत्येकी 12 तर नागरी सुविधा अंतर्गत येणार्‍या 60 ग्रामपंचायतींनी ही पुढाकार घेत प्रत्येकी 2 शिक्षक स्वयंसेवकांची निवड करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी यावेळी केले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सोनू कुथे, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, समाजकल्याण सभापती पूजा शेठ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर उपस्थित होते. जिल्ह्यात आजघडीला 850 च्या वर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या संकल्पनेतून शिक्षक स्वयंसेवक पद भरून गुणवत्ता वाढीसाठी हातभार लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यात 220 शिक्षक स्वयंसेवक पद भरण्यासाठी आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे शिक्षकांची रिक्त पदे जास्त असल्याने पंचायत समितीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक पंचायत समितीने 12 असे एकूण आठ पंचायत समितीच्या वतीने 96 तर नागरी सुविधा योजनेंतर्गत येणार्‍या 60 ग्रामपंचायतींनी प्रत्येकी 2 असे एकूण 120 शिक्षक स्वयंसेवक तर 1500 ते 3000 हजार लोकसंख्या असलेल्या गावाने प्रत्येकी एका शिक्षक स्वयंसेवक निवड करण्याचे आवाहन ही यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी यावेळी केले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर पंचायत समिती व ग्रामपंचायत यांनी शिक्षक स्वयंसेवक निवड केल्यास एकूण जवळपास 700 पदे भरण्यात येतील. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कायम राखण्यास मदत होणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share