पुराडा येथे ९१ जोडपी विवाहबंधनात; कन्यादान योजनेचे अनुदान वाढवण्यासाठी प्रयत्न करणार – गृहराज्यमंत्री पंकज भोयर

सामूहिक विवाह सोहळ्याला लोकप्रतिनिधींची उपस्थिती; आदिवासी बांधवांचा उत्साह
देवरी: ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब कुटुंबातील उपवर मुला-मुलींचे विवाह सुलभ व्हावे, या उदात्त हेतूने पुराडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ‘आदिवासी सामूहिक विवाह सोहळा’ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात तब्बल ९१ जोडपी विवाहबंधनात अडकली. याप्रसंगी उपस्थित असलेले गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी, “कन्यादान योजनेचे अनुदान वाढविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून साकडे घालणार,” असे आश्वासन दिले.
सविता संजय पुराम व मित्रपरिवार तथा मा धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर समिती देवरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत भव्य आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

विवाह सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. विवाह सोहळ्याचे उद्घाटन राज्यसभा सदस्य मायाताई इवनाते,यांच्या हस्ते गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी आ.संजय पुराम, सविता पुराम,जी. प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर,खा.नामदेवजी किरसान,उपाध्यक्ष जी.प.सुरेश हर्षे,संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर,केशव मानकर,भैरसिंग नागपुरे, पं.स. सभापती अनिल बिसेन, नगराध्यक्ष संजु उईके, कृषी उ.बा.स. सभापती प्रमोद संगीडवार,भरतसिंग दुधनाग,रमेश ताराम ,येशूलाल उपराडे,विजय शिवणकर, अँड.प्रशांत संगीडवार,प्रकल्प अधिकारी उमेश काशीद,उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड,तहसीलदार शुभम पाटील तसेच लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्र्यांच्या हस्ते वधु-वरांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना नामदार पंकज भोयर म्हणाले की, वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांना लग्नकार्याचा खर्च पेलवणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत सामूहिक विवाह सोहळे हे समाजासाठी वरदान ठरत आहेत. शासनाच्या कन्यादान योजनेद्वारे मिळणारे अनुदान सध्याच्या परिस्थितीत अपुरे वाटत असून, त्यामध्ये वाढ करण्यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे विशेष मागणी करणार आहोत.
पुराम दाम्पत्याचा सामाजिक उपक्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सविता पुराम म्हणाल्या की, हे विवाह सोहळे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून आदिवासी समाजाच्या एकतेचे आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवितात.यावेळीआ.संजय पुराम म्हणाले की,वाढती महागाई बेताची आर्थिक परिस्थिती मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक भार पडू नये यासाठी दरवर्षी सामूहीक आदिवासी विवाह सोहळ्याचे आयोजन आपण करणार असून कन्यादान योजनेअंतर्गत शासनाने अनुदान वाढवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी मंत्र्यांकडे केली .
आमदार संजय पुराम यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून ते एक कौटुंबिक स्नेहसंमेलनच ठरले. सविता पुराम यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत नवदाम्पत्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन चेतन उके यांनी तर उपस्थितांचे आभार अँड.प्रशांत संगीडवार यांनी मानले.
या सोहळ्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक भार हलका झाल्याने उपस्थित पालकांनी आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय पुराम मित्र परिवाराने व कार्यकर्त्यांनी व अथक परिश्रम घेतले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें