आपल्या घरात चोरी करणारा मुलगाच निघाला चोर
आमगाव : येथील घरफोडीच्या गुन्ह्यात मुलगाच चोर निघाल्याचे समोर आले असून याप्रकरणी आमगाव पोलिसांनी आज, 30 जुलै रोजी तीन आरोपींना अटक केली आहे.
आमगाव येथील मंगल मेंढे या घरी नसताना 29 जुलै रोजी 76,830 रुपयांचे दागिने चोरी झाले होते. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान याप्रकरणात मेंढे यांचा मुलगा मनोज उर्फ मोनू मेंढे (25) यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. तपासादरम्यान आज, 30 जुलै रोजी मनोज आपल्या दोन मित्र अंकूश ठाकरे (24) व रुपेश बारापात्रे (29) दोन्ही रा. आमगाव यांच्यासोबत दुचाकीने नागपूर येथे दागिने विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन किडंगीपार रेल्वेफाटकावर आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने जप्त केले असून पुढील तपास सुरु आहे.