स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी 14 शाळांची निवड

गोंदिया: स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशात स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील 1617 शाळांनी नोंदणी केली होती. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पथकांमार्फत शाळांची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. सर्वाधिक गुणांकण प्राप्त 14 शाळांची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदर उपक्रमात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम अग्रस्थानी आहे.

स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेत जिल्ह्यातील 1663 शाळांपैकी 1371 शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत शाळांनी स्वच्छ विद्यालय पोर्टलवर त्यांच्या आवारातील पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, हात धुणे, देखभाल, भौतिक सुविधा आणि कोरोना संदर्भातील सुरक्षितता यासंदर्भातील 59 प्रश्न आभासी अर्जामध्ये स्वमूल्यांकन करून भरले. शाळांनी भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या नेतृत्वाखाली 9 ते 15 मेपर्यंत शाळा तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गोंदिया तालुक्यातील 304, आमगाव 112, अर्जनी मोर133, देवरी 172, गोरेगाव 128, सडक अर्जुनी 126, सालेकसा 97 आणि तिरोडा तालुक्यातील 117 अशा 1242 शाळांची तपासणी करण्यात आली. पैकी शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येकी 7 अशा 14 शाळांची निवड घली आहे. मुल्यांकन समितीनी शाळेतील सुविधांवर 95 ते 106 गुण दिले आहे. निवड झालेल्या शाळांना पुरस्कार वरिष्ठ स्तरावर दिले जातील. अशी माहिती उपक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी बाळकृष्ण बिसेन यांनी दिली.

या शाळा ठरल्या पात्र

स्वच्छ विद्यालयात शहरी भागातील शाळांबरोबरच ग्रामीण माध्यमिक स्तरावर प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कूल चुलोद, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भुईपार, श्रीमती ए. पशिने कन्या शाळा दासगाव (बु.), पोद्दार इंटरनॅशनल स्कूल हिवरा, डी. बी. विज्ञान महाविद्यालय गोंदिया, कमलादेवी जैन विद्यालय देवरी आणि एस. एम. पटेल कॉलेज रेलटोली गोंदिया आणि प्राथमिक विभागातून सरस्वती ज्ञानपीठ कॉन्व्हेंट अर्जुनी मोर, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कोडेलोहारा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा राका, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दातोरा, अमित पूर्व माध्यमिक शाळा घरतटोला, जिल्हा परिषद वरिष्ठ माध्यमिक शाळा खैरलांजी या चौदा शाळांचा समावेश आहे.

Share