तीन दिवसात डिझेल, पेट्रोलवरील कर कमी करा
देवरी: दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा डिझेल आणि पेट्रोल वरील सर्व कर तीन दिवसात कमी करुन दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा इतर तालुक्याबरोबरच देवरी तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने सुद्धा 25 मे रोजी स्थानिक तहसिलदार मार्फत राज्य सरकारला दिला आहे.
निवेदनानुसार, सर्व सामान्य जनतेला महागाई पासून दिलासा देण्यासाठी ज्या प्रकारे केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्क मधून पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये कर कमी केला आहे. त्याचप्रकारे राज्य सरकारने सुद्धा सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी कर कमी करायला पाहिजे. केंद्र सरकारचा कर हा 19 रुपये असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात कर कमी केला. महाराष्ट्र राज्य सरकार सोडून अन्य राज्य सरकारने 17 ते 18 रुपये कर आकारत आहे. परंतु सर्वात जास्त कर आकारणार्या महाराष्ट्र राज्य सरकारने 30 रुपये कर घेऊन सुद्धा त्याप्रमाणात कर कमी न करता केवळ 2 रुपये कर कमी केला आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत पेट्रोल, डिझेलवरील कर कमी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शाहू, मार्गदर्शक महेंद्र मेश्राम, तालुकाध्यक्ष इंदरजीतसिंग भाटिया, महामंत्री योगेश ब्राह्मणकर, नितेश वालदे, मनेंद्र मोहबंशी, बाळकृष्ण गायधने, सुरेंद्र खोटेले, नितेश झिंगरे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष माजीद खान, तालुकाध्यक्ष इमरान खान, विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, उपाध्यक्ष दीपक शाहू, शंभू अग्रवाल, लिलाधर गुरुपंच आदी उपस्थित होते.