अस्वलाच्या हल्ल्यात दोन बहिणी जखमी
सडक अर्जुनी: सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणार्या सालईटोला गावालगत असलेल्या शेतशिवारात आज, 4 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता एका अस्वलाने दोन बहिणींवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.
सालईटोला येथील प्रेमा घनश्याम भोंडे (20) व नेहा घनश्याम भोंडे (17) या बहिणी आपल्या आईसोबत जंगलालगत असलेल्या स्वतःच्या शेतात मोहफुल वेचण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, सकाळी 8 वाजता अस्वलाने मोठ्या बहिणीवर अस्वलाने हल्ला केला. तिला वाचविण्यासाठी लहान बहीण धावली असता तिच्यावरही अस्वलाने हल्ला केला. यात दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रेंगेपार सहवनक्षेत्राचे वन कर्मचारी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी आले होते. जखमी मुलींना वन विभागाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सालईटोला व परिसरातील नागरिक केली आहे. दरम्यान, यासंदर्भात वनपरिक्षेत्राधिकारी सुनील मडावी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाली असून चौकशी करून शासकीय नियमानुसार जखमींना वनविभागाकडून मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.