गोंदिया 03: राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन साहित्याच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटनेची विदर्भ प्रांताची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. या कार्यकारिणीत विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक अॅड. लखनसिंह कटरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीत ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक अविनाश पाठक यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विदर्भ प्रदेश महामंत्री म्हणून विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व कवी अॅड. सचिन नारळे हे कार्यभार सांभाळणार आहेत. तसेच परिषदेचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी म्हणून गोवर्धन बिसेन यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झालेले अॅड. लखनसिंह कटरे हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागातून राजपत्रित अधिकारी म्हणून निवृत्त झाले असून सध्या गोंदिया जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. त्यांचे मराठी आणि हिंदीत 14 ग्रंथ प्रकाशित झाले असून आगामी 6 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले असून राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे मानद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ वाङ्मय सेवेसाठी त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. या कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षासाठी राहणार आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष साहित्यिक प्रवीण दवणे, कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक, उपाध्यक्ष नितीन केळकर, प्रदेश महामंत्री डॉ. बळीराम गायकवाड व प्रदेश संघटनमंत्री सुनील वारे आदींनी नवनिर्वाचित कार्यकारिणीतील सदस्यांचे अभिनंदन केले असून त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.









