बिरसी विमानतळ पुर्नवसितांचा प्रश्न मार्गी लागणार
गोंदिया 29: जिल्ह्यातील बिरसी विमानतळाअंतर्गत Birsi Airport असलेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लागेल चिन्हे दिसू लागली आहेत. खासदार सुनील मेंढे यांनी सोमवार 28 मार्च रोजी पुर्नवसनासंदर्भात प्रमुख अधिकार्यांची महत्त्वाची बैठक घेत यासंदर्भात निर्देश दिले. बिरसी विमानतळ परिसरातील 106 लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विषयाला घेऊन गावकर्यांनी आंदोलनाची भूमिकाही घेतली होती. या लोकांचे पुनर्वसन होणे क्रम प्राप्त असल्याने हा विषय तत्काळ मार्गी लागावा या दृष्टीने आज पुन्हा एकदा खासदार सुनील मेंढे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व अन्य प्रमुख अधिकार्यांना घेऊन महत्त्वाची बैठक घेतली.
बैठकीत उपजिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी जिल्हाधिकारी जयराम देशपांडे, सुभाष चौधरी, जिल्हा भूमिअभिलेख अधिकारी रोहिणी सागरे, तहसीलदार धनंजय देशमुख, अप्पर तहसीलदार अनिल खंडतकर, विमानपतनचे अधिकारी गोस्वामी, गोंदियाच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तिरोडाच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, पोलीस निरीक्षक बन्सोड, मा.बोरसे, दर्भडे, रेल्वे अधिकारी मुकेश सिंग, भाजप जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, गजेंद्र फुंडे, गोल्डी गावंडे, बिरसीचे उपसरपंच हेमराज तावाडे, सुरेंद्र तावाडे व गावातील नागरिक, पोलिस प्रशासन तसेच बांधकाम विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पुनर्वसन करावयाच्या जागेची तात्काळ मोजणी करून त्याचे भूखंड पाडण्यात यावे आणि ती जागा त्या त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश खासदारांनी दिले. विमानतळ व्यवस्थापन दोन दिवसात मोजणीसाठी द्यावयाचे पैसे संबंधित विभागाकडे जमा करून सोमवार भुमिअभिलेख कार्यालयाकडून तात्काळ मोजणी करून द्यावी असे खासदार यांनी सांगितले. या जागेची मोजणी करून प्रमाणपत्र दिल्यानंतर नगर रचनाकार विभागाच्यावतीने तात्काळ बांधकामाला परवानगी देण्याच्या सूचना खासदारांनी केल्या. जवळपास पंधरा दिवसात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन आगामी एक महिन्याच्या कालावधी प्रत्यक्ष घरांच्या बांधकामाला सुरुवात होईल या दृष्टीने कामाची गती वाढावी व नियोजन करावे असेही खासदार यांनी सांगितले. पुनर्वसनाच्या दृष्टीने आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.