अखेर उद्यापासून चिमुकल्यांची शाळेत किलबिल सुरु
◾️जिल्हाधिकारी गोंदिया यांचे शाळा सुरु करण्याचे आदेश
गोंदिया 30: पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागात शाळा 1 डिसेंबरला सुरू होणार आहे. अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी पत्राद्वारे दिली आहे.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी लागणार आहे. स्कूल बसचा वाहन चालक, मदतनीस यांचेही लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी बसमधील मदतनीसाने घ्यावी. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात शाळा भरणार आहे. 3 ते 4 तासच शाळा भरणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे. घरात कुणी आजारी असेल तर विद्यार्थ्याला घरीच थांबवावे लागणार आहे.जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. पहिले दोन आठवडे आनंददायी शिक्षणावर भर द्यावा लागणार आहे.