कुरखेडातील कलावंत व पर्यटनस्थळे झळकणार चित्रपटात
मुंबई येथील एका चित्रपट निर्माती कंपनीद्वारे ‘निबंध या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात केली आहे. कुरखेडा शहरात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचे चित्रिकरण होत आहे. त्यामुळे चित्रिकरण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. या चित्रपटात झाडीपटी रंगभूमीतील कलाकारांना काम करण्याची संधी दिली आहे. कुरखेडा तालुक्यातील पर्यटन स्थळांवर चित्रिकरण केले जात आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल यांच्या हस्ते फित कापून चित्रिकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चित्रपट निर्माते अशोक खोडे, दिग्दर्शक संजीव मोरे, सुजत विश्वकर्मा, तेजस्वीनी नागापूरे, विलास गावंडे आदी उपस्थित होते. एक लहान बालक व कार्यालयीन भ्रष्टाचार यावर या चित्रपटाचे कथानक आधारले आहे. चित्रपटाचे दिर्ग्दशक असलेले संजीव मोरे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख चंदेल यांच्याशी दोन वर्षापूर्वी मुंबई येथे भेट झाली होती.
त्यावेळी चंदेल यांनी जिल्ह्यातील नैसर्गिक सौदर्र्याची माहिती देत येथे एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा आग्रह केला होता. त्याचवेळी मोेरे यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन अनेक नैसर्गिक स्थळांची व चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या लोेकेशनची पाहणी केली. मात्र, कोरोनामुळे चित्रीकरणाचे काम पुढे ढकलण्यात आले होते. 10 ऑक्टोबरपासून चित्रीकणाला सुरुवात झाली आहे. जवळपास 100 कलाकार व सहाय्यकांचा संच कुरखेडात दाखल झाला आहे.