केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यावर असताना नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने नितीन गडकरी यांना कोणतीही ईजा झाली नसल्याचं देखील कळतं आहे.

छत्रपती चौकात नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडी एका ट्रकवर आदळली. शनिवारी रात्री ही घटना घडल्याचं समोर येत आहे. या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. अपघाताची पाहणी केल्यानंतर नितीन गडकरी आपल्या निवासस्थानी परतले.

सोनेगाव येथील तलाव सौंदर्यकरणाच्या भूमिपुजनासाठी नितीन गडकरी गेले होते. भूमिपुजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गडकरी सात गाड्यांच्या ताफ्यासह घराकडे रवाना झाले. छत्रपती चौकातून जात असताना ट्रकने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ताफ्यात सर्वात पुढे असलेली गाडी ट्रकला धडकली.

अपघात गंभीर असला तरी गाडीच्या फक्त पुढच्या भागाचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कोणीही जखमी झालं नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share