अट्टल मोबाइल चोरास अटक | गोंदिया रेल्वे स्थानकावर ₹ 43 हजारांच्या मुद्देमालासह धारदार चाकू जप्त
गोंदिया 25 : गोंदिया रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गाडीतून पोलिसांना बघून पळ काढणार्या आरोपीस अटक करण्यात आली. तसेच त्याच्या जवळून 6 मोबाइल व 1 धारदार चाकू असा 43 हजार 200 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्या अट्टल मोबाइल चोरास अटक न्यायालयात हजर केले. ही कारवाई आज बुधवार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 5.30 वाजता करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, प्रवासी शिशुपाल भरतलाल बर्वे (वय 23) रा. भांकरपूर, गली नं.1, ता. राजनांदगाव, जि. दुर्ग (छ.ग.) हे 24 ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेसने राखी सणानिमित्त राजनांदगाव ते गोंदिया असा प्रवास करीत होते. ते गाडीच्या समोरील जनरल बोगीमध्ये बसले होते. गाडी 12.30 वाजता गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर पोहचली. गाडीतून उतरतेवेळी प्रवाशांच्या गर्दीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून त्यांचा 12 हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरला. त्यांच्या तक्रारीवरून गोंदिया रेल्वे पोलिसांनी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे करीत होते.
आज बुधवार, 25 ऑगस्ट रोजी गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन आरोपीचा शोध घेण्यात आला. एक संशयित इसम गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात दिसून आला. पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात गस्त घातली होती. ये-जा करणार्या गाड्यांकडे ते लक्ष ठेवून होते. सकाळी 5.30 वाजता गीतांजली एक्सप्रेस (02260) प्लॅटफॉर्म-3 वर थांबली. त्या गाडीत पोलीस स्टॉफसह गस्त करीत असताना एक इसम त्यांना बघून गाडीच्या समोरील कोचमधून उडी मारून आऊटर रेल्वे ट्रॅक साईडला पळून जावू लागला. त्यामुळे स्टॉफने त्याला घेराव घालून पकडले. त्याला पळून जाण्याचे कारण व नाव-पत्ता विचारण्यात आले. त्याने हर्ष राजेश बंसोड (वय 22) रा. भांकरनगर, वॉर्ड-13, ता.जि. दुर्ग (छ.ग.) असे सांगितले. तसेच गाडीमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचेही त्याने सांगितले.
चोराकडून 6 मोबाइल व 1 धारदार चाकू जप्त
दरम्यान पोलीस स्टाफने त्याची अंगझडती घेतली. त्यात एक 12 हजार रूपयांचा मोबाइल, 5 हजार 500 रूपयांचा दूसरा मोबाइल, 8 हजार रूपयांचा तिसरा मोबाइल, 10 हजार रूपयांचा चौथा मोबाइल, 2 हजार 500 रूपयांचा पाचवा मोबाइल, 2 हजार रूपयांचा सहावा मोबाइल व एक धारदार चाकू असा एकूण 43 हजार 200 रूपयांचा माल मिळून आला.
चोरावर विविध पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल
पोलीस स्टाफने आणखी त्याची चौकशी केली. त्यात रेल्वेमध्ये लहानमोठ्या चोर्या करण्याची सवय असल्याचे त्याने सांगितले. विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध 8 गुन्हे दाखल असून न्यायालयाने त्याला शिक्षासुद्धा दिली आहे. गाडीत चोरी करण्याच्या उद्देशाने बसलो होतो व पोलिसांना बघून पळून जाण्याचे प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.
आरोपीला नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केल्यावर सदर मोबाइल आपण चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्या जवळील मोबाइलची पाहणी केली असता नमूद गुन्ह्यातील एक मोबाइल, त्या व्यतिरिक्त इतर पाच महागडे मोबाइल व धारदार चाकू मिळून आला. चौकशीअंती सदर गुन्हा त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. संपूर्ण माल दोन पंचासमक्ष जप्त करून त्या अट्टल मोबाइल चोरास अटक करण्यात आली. तसेच प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी लोहमार्ग नागपूर यांच्या समक्ष हजर करण्यात आली.
सदर कारवाई नागपूरचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी अनिता खेडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस नायक ओमप्रकाश सेलोटे, पोलीस शिपाई नंदकिशोर नारनवरे, अखिलेश राय, निरीक्षक नंदबहादूर, उपनिरीक्षक विंनेक मेश्राम, रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक नासिर खान, निरीक्षक अनिल पाटील, उपनिरीक्षक दुबे, रेसुब गुप्तचर विभागाचे प्रधान आरक्षक कटरे आदींनी केली.