नवी दिल्ली : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले जावे यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असे त्यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणे योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
“देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचे नाव देणेच योग्य आहे” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
“ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांमुळे आपण सर्व भारावून गेलो आहोत. विशेषतः हॉकीमध्ये आमच्या मुला -मुलींनी दाखवलेली इच्छाशक्ती, विजयाच्या दिशेने दाखवलेली जिद्द वर्तमान आणि भावी पिढीसाठी एक मोठी प्रेरणा आहे,” असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.








