रश्मी शुक्ला यांचा मोठा गौप्यस्फोट; ‘त्यावेळी सरकारी आदेशाने…’

मुंबई 29: पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर काही दिवसांपुर्वी गंभीर आरोप करण्यात आले होते. सरकारी कामकाजाचा डेटा लीक करणे त्याचबरोबर काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. याच प्रकरणात रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने समन्स बजावलं होतं. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे.

महाराष्ट्र सरकारनेच काही फोन नंबर टॅप करण्याची मंजुरी दिली होती, असं रश्मी शुक्ला यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं आहे. ज्यावेळी रश्मी शुक्ला गुप्तवार्ता विभागाचं नेतृत्व करत होत्या. त्यावेळी महाराष्ट्रातील डीजीपी यांनी काही फोन नंबरवर नजर ठेवण्यास सांगितलं होतं. हे फोन नंबर राजकीय नेत्यांच्या निगडीत मध्यस्थींचे होते. त्यामध्ये इच्छित स्थळी पोस्टींग आणि बदलीसाठी मोठी रक्कम मागण्यात येत होती, असा गौप्यस्फोट रश्मी शुक्ला यांच्या वकिलांनी केला आहे.

डीजीपींच्या आदेशामुळे रश्मी शुक्ला यांनी या फोन नंबरवर पाळत ठेवली. रश्मी शुक्ला केवळ डीजीपींनी दिलेल्या आदेशाचं पालन करत होत्या, असंही त्यांनी न्यायालयात म्हटलं आहे. त्यानंतर नियमानुसारच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम खुंटे यांच्याकडे परवानगी मागितलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, या प्रकरणात रश्मी शुक्ला यांना बळीचा बकरा बनला जात असल्याचं देखील त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे. प्रसिद्ध वकिल महेश जेठमलानी हे रश्मी शुक्ला यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी लेटर बाॅम्ब देखील फोडला होता.

Share