‘जीने के लिए सोचाही नहीं, दर्द सवारने होगे’ गाणं गात व्हिडीओ बनवला, नंतर अल्पवयीन तरुणाची आत्महत्या

गांधीनगर: कोरोना संकटामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे. मात्र, आपल्याला या नकारात्मकतेतून बाहेर पडायला हवं. अर्थात हे मोठं आव्हान आहे. पण ते करणं आज जास्त आवश्यक आहे. विशेष म्हणजे आपल्याला फक्त स्वत:ला मोटिवेट करायचं नाहीय तर आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनामध्ये उत्साह आणि सकारात्मकता भरायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य आहे. कारण नैराश्यातून अनेक लोक आत्महत्या करताना दिसत आहेत. गुजरातचं बडोदा शहरदेखील आज आत्महत्येच्या एका घटनेने हादरलं आहे. नैराश्यात जावून अवघ्या 16 वर्षीय अल्पवयीन तरुणाने आत्महत्या केली आहे. तो आत्महत्येमागील कारण सांगून गेला नाही. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर तो सोडून गेलेल्या काही गोष्टी आपल्याही मनाला चटका लावतील अशाच आहेत.

आई-वडील मजूर

बडोद्याच्या सनफार्म रोड येथील परिसरात संबंधित अल्पवयीन तरुण राहत होता. त्याचे आई-वडील दोघं मजुरीचं काम करतात. तो स्वत: एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करायचा. संपूर्ण कुटुंब मेहनत करत होतं. त्याचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यांना वाटलं त्यांचा मुलगाही कामावर गेला असेल. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी जे बघितलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ज्याच्यासाठी ते झटत होते, संघर्ष करत होते, परिस्थितीशी लढत होते त्याच काळजाच्या तुकड्याने आत्महत्या केली.

मुलाच्या आत्महत्येनंतर आई-वडील आणि परिसरातील नागरिकांना धक्का

मुलाला घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केलेल्या परिस्थितीत बघितल्यानंतर आई-वडिलांनी हंरबडा फोडला. त्यांच्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घरात आले. यावेळी त्यांनादेखील या गोष्टीचा धक्का बसला. थोड्याच वेळात आत्महत्येची बातमी संपूर्ण परिसरात समजली. अनेक लोक मृतकाच्या आई-वडिलांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं.

पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण व्हिडीओ

पोलिसांनी तपास केल्यानंतर अल्पवयीन तरुणाच्या मोबाईलमधील एक व्हिडीओ त्यांच्या हाती लागला. मुलाने आत्महत्या करण्याआधी मोबाईलमध्ये एक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओत तो ‘मासूम’ या हिंदी चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं’ हे गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ त्याने आत्महत्या करण्याआधीच बनल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि इतर वस्तू तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत.

तरुणाने नेमकी आत्महत्या का केली?

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना देखील धक्का बसला आहे. एक 16 वर्षाचा तरुण कुणालाही कोणताही मागमूस न लागू देता आत्महत्या करतो. त्याच्या आतमध्ये सुरु असलेल्या आक्रोशाची तो त्याच्या आई-वडिलांनाही थांगपत्ता लागू देत नाही. विशेष म्हणजे तो आत्महत्या करण्याआधी ‘जीने के लिए सोचाही नहीं दर्द सवारने होगे’ असं गीत मोबाईलमध्ये तयार करतो. त्याच्या याच व्हिडीओतून तो भयानक नैराश्यात होता हे लक्षात येतंय. पण त्याने नेमकी आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share