अभिनेत्रीने हात जोडून मागितली माफी
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अनोख्या स्टाइलसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. उर्वशीचे फॉलोवर्स फक्त भारतातच नाही तर विदेशातही आहेत. नुकतीच उर्वशी युरोपमध्ये चित्रीकरणासाठी गेली होती. पण तिथे उर्वशीकडून एक चूक झाली आणि अभिनेत्रीने सोशल मीडियावर त्या चुकीची माफी सुद्धा मागितली. उर्वशीने एका चाहत्यांचा व्हिडीओ शेअर करत त्याची माफी मागितली आहे.
उर्वशीने इंस्टाग्रामवर एका चाहत्याचा व्हिडीओ शेअर करत त्याची माफी मागितली. झालं असं की, उर्वशी युरोपमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलमध्ये उर्वशीचे फॅन्स तिला भेटण्यासाठी आले होते. हे फॅन्स उर्वशीला भेटण्यासाठी मागील ७२ तास न झोपता तिथे उभे होते. परंतु, जेव्हा उर्वशी हॉटेलबाहेर आली तेव्हा तिने तिथे उपस्थित काही फॅन्ससोबत फोटो काढले व घाईत असल्याने निघून गेली. उर्वशीचं हे वागणं मुळीच न आवडलेल्या एका चाहत्याने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो व्हिडीओ पाहून उर्वशीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि हात जोडून माफी मागितली.
फॅन्सचा व्हिडीओ शेअर करत उर्वशीने लिहिलं, ‘मी खरच तुमची माफी मागते. माझे जे पण फॅन्स युरोपमध्ये आहेत त्यांची सगळ्यांची मी माफी मागते. तुम्ही माझ्यासाठी ७२ तास हॉटेल बाहेर उभे राहिलात व माझी तब्येत खराब असल्याने मी तुम्हाला वेळ देऊ शकले नाही. मी तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करते. मी तुमचा सन्मान करते. कृपया त्या व्हिडिओमधील मुलाला टॅग करा. मी त्याला वैयक्तिकरित्या येऊन भेटेन. मला खरच माफ करा.’