TikTok लवकरच भारतात ? बंदीनंतरही सरकारच्या सर्व डिजीटल नियमांचे पालन

मुंबई : शॉर्ट व्हिडिओ स्ट्रीमिंग मोबाइल अ‍ॅप्लिकेशन टिकटॉकने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला माहिती दिली आहे की, त्यांनी नवीन सोशल मीडिया आणि मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. या अ‍ॅपवर सध्या भारतात बंदी आहे, तरीदेखील कंपनीने केंद्र सरकारच्या नव्या अटींचे पालन केले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, ‘मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात टिकटॉकने म्हटले आहे की, त्यांनी नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. हे पत्र मंत्रालयाला नियमित संवादाचा भाग म्हणून पाठवले असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. तथापि, मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती घेत म्हटले आहे की, कंपनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा या अॅपवरील बंदीवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही.

मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, टिकटॉकवरील बंदी वेगळ्या कारणासाठी लादली गेली आहे. कंपनी नव्या आयटी नियमांचे पालन करत आहे, हे चांगले आहे, परंतु बंदी हा वेगळा मुद्दा आहे. टिकटॉकवरील बंदीचा आणि नव्या डिजीटल नियमांचा काहीही संबंध नाही. तसेच टिकटॉक हे अॅप त्या सोशल मीडिया साईट्सपैकी नाही, ज्यांचे 50 लाख किंवा अधिक वापरकर्ते आहेत. अशा सोशल मीडिया साईट्सना अनुपालन तपशील शेअर करण्यास सांगितले गेले होते.

टिकटॉकला भारतात कमबॅकची आशा

टिकटॉकच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी सरकारबरोबर काम करून भारतात परत येण्याची वाट पाहत आहे. टिकटॉक भारतीय बाजारासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. आम्ही नेहमीच कायद्याचे पालन करण्याचे काम केले आहे, भारतात परत येण्यासाठी आणि आमच्या लाखो क्रिएटर्स आणि वापरकर्त्यांना पुन्हा एक मजेदार व्यासपीठ देण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत. असे करत असताना आम्ही सरकारच्या सर्व नियमांचे पालन करु.

Print Friendly, PDF & Email
Share