शिक्षक व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांतर्गत क्षेत्रभेट कार्यक्रम ज्ञानवर्धक ठरला

आमगाव : श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, आमगाव अंतर्गत आयोजित शिक्षक व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या निमित्ताने डी.एल.एड. प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी श्री लक्ष्मणराव मानकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे क्षेत्रभेट देऊन महाविद्यालयातील विविध प्रयोगशाळांना भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी तेथील शैक्षणिक, तांत्रिक व प्रात्यक्षिक कार्याची सविस्तर माहिती जाणून घेतली.

क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विशेषतः सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या प्रयोगशाळेला भेट दिली. तेथे उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध आधुनिक उपकरणे, प्रयोगशाळेतील कार्यपद्धती तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील विविध तांत्रिक बाबींची माहिती दिली.

यावेळी श्री सहारे सर यांनी विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राची व्याप्ती, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरची भूमिका, बांधकाम क्षेत्रातील विविध कामांचे स्वरूप तसेच या क्षेत्रातील रोजगार व करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून तांत्रिक ज्ञान मिळाले.

या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली असून, पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध झाली. शिक्षक व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा क्षेत्रभेट कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व उपयुक्त ठरला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें