प्रहार टाईम्स l देवरी : तालुक्यातील सुरतोली माध्यमिक विद्यालय, लोहारा येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवन जगण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राधेश्याम अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम सविस्तर समजावून सांगितले. नशामुक्त जीवन हेच उज्ज्वल भविष्याची खरी गुरुकिल्ली असून, तरुण वयातच चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक परिहार सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व्यसनांच्या आहारी न जाता शिक्षणावर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याची व समाजात नशामुक्तीचा संदेश पसरवण्याची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक प्रकाश परिहार तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.








