महागाईचा भडका! घरगुती एलपीजी सिलेंडर २९ रुपयांनी महागला; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असतानाच, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला आणखी एक मोठा झटका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात तब्बल २९ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत घरगुती गॅसच्या किमतीत झालेली ही दुसरी वाढ असल्याने ‘कॉमन मॅन’च्या घरातील किचन बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे.

प्रमुख शहरांतील नवे दर (१४.२ किलोचा सिलेंडर)

ही दरवाढ १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरवर लागू करण्यात आली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये आता खालीलप्रमाणे दर असतील:

  • नवी दिल्ली: ९१३ रुपयांवरून आता ९४२ रुपये.
  • मुंबई: ९१२.५० रुपयांवरून आता ९४१.५० रुपये.
    यापूर्वी ७ मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा २९ रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक अगोदरच पेट्रोल-डिझेल आणि इतर महागाईमुळे मेटाकुटीला आले असताना, त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

व्यावसायिक (कमर्शियल) गॅसही कडाडला; ५ महिन्यांत दर दुप्पट

केवळ घरगुतीच नव्हे, तर व्यावसायिक वापराच्या (Commercial LPG) सिलेंडर दरातही प्रचंड वाढ झाली आहे. १ जून रोजी कमर्शियल सिलेंडरचे दर ४२ रुपयांनी वाढले आहेत. गेल्या अवघ्या ५ महिन्यांत १९ किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट झाले आहेत.
१९ किलो सिलेंडरच्या दराचा प्रवास:

  • १ जानेवारीपूर्वी: १५८० रुपये
  • १ जून रोजी: ३११३.५० रुपये

हॉटेलिंग झाले महाग: कमर्शियल गॅसच्या दरवाढीमुळे हॉटेल आणि बाहेरील खाद्यपदार्थांचे दर आधीच वाढले आहेत. जानेवारी ते जून दरम्यान या सिलेंडरमध्ये सातत्याने शेकडो रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

भविष्यात आणखी दरवाढीची भीती?

मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी कंपन्यांना अजूनही प्रत्येक घरगुती सिलेंडरमागे ७०३ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलेंडरचे भाव आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅस आणि अन्नधान्याचे दर सातत्याने वाढत असतानाच, आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास महागाईचा हा आलेख आणखी वर जाण्याची शक्यता असून यामुळे सर्वसामान्यांची चिंता कमालीची वाढली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें