देवरी: तालुक्यातील चिचगड ग्रामीण रूग्णालयाच्या सहायक अधीक्षकांला १९ सप्टेंबर रोजी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १ लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई चिचगड ग्रामीण रूग्णालयात करण्यात आली. मनोज बाबूलाल जांभूळकर (५७) असे आरोपीचे नाव आहे.
चिचगड ग्रामीण रूग्णालयातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्याला पेंशन, रजा व अन्य बाबींचा निधी मिळवून देण्यासाठी रूग्णालयाचे वर्ग ३ चे सहायक अधीक्षक जांभूळकर यांनी दीड लाख रूपयांची लाच मागितली होती. सेवानिवृत्त कर्मचार्याने याबाबतची तक्रार नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाला केली. तक्रारीच्या आधारे १३ सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी मनोज जांभुळकर (५७) यांनी १ लाख रुपयांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी त्यांनी चिचगड ग्रामीण रुग्णालयात नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून मनोज जांभूळकर याला तक्रारदाराकडून लाचेचे १ लाख रूपये स्विकारताना रंगेहाथ पकडले. तसेच त्यांचा कर्मचार्याचा मोबाईल फोन जप्त करून त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्यावर २० सप्टेंबर रोजी चिचगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नागपूर एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक शुभांगी वानखडे, पोलिस निरीक्षक वैशाली आठवले, हवालदार अस्मिता मल्लेलवार, वंदना नगराळे, अनिल बहिरे, अमोल मेंगेरे व विजय सोलंके यांनी केली.









