देवरी: कत्तलीसाठी जनावरे कोंबून नेत असलेल्या ट्रकला नाकाबंदी करून देवरी पोलिसांनी पकडले. दरम्यान ट्रकमधील ४३ जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई १५ व १६ फेब्रुवारीच्या पहाटे दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नईम नजीर पठान (३७), अ. कासीद वाहब (४८), हमीद खान (४८) तिन्ही रा. मुर्तीजापूर जि. अकोला असे आरोपींची नावे आहेत.
सविस्तर असे की, देवरी पोलिस गस्त घालत असतांना नकटी ते भर्रेगाव मार्गावर ट्रक क्र. एमएच.४०/बीजी. १५८३ ला संशयाच्या आधारावर थांबविण्यात आले. दरम्यान पाहणी केली असता, ट्रकमध्ये ४३ जनावरे निर्दयीपणे कोंबून नेत असल्याचे समोर आले. यावरून २ लाख २४ हजार रुपये किंमतीचे ४३ जनावरांची
तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. तसेच ट्रकसह १४ लाख २४ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिन्ही आरोपी विरुद्ध देवरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.









