एसटीचे संपर्क क्रमांक ‘नॉट रिचेबल’
गोंदिया: एसटीच्या प्रवासासंदर्भात प्रवासी, विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांकडे तक्रार करता येणार आहे. त्यानंतर तक्रारीचे तातडीने निराकरण होईल, अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून उभी करण्यात आली आहे. एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगारातील आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख आणि कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक लिहिण्यात आला आहे. असे असले तरी नमूद क्रमांक बंद किंवा संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे नमूद क्रमांकावर संपर्क साधला असता निदर्शनास आले.
एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत असेल, चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असेल, वाहक उद्धटपणे बोलला किंवा वाहकाने नियोतिज थांब्यावर बस थांविली नसेल किंवा उतरवले नाही अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या असतात. मात्र, तक्रार नेमकी कुठे करावी, हा त्यांच्या समोरचा प्रश्न असतो. यापूर्वी एसटी बसमध्ये संबंधित आगार आणि स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध केलेला असायचा परंतु काही काळाने हे नंबर दिसेनासे झाले. त्यामुळे एसटीच्या प्रवासात काही अडचण आल्यास त्यासाठी दाद कोणाकडे मागावी, हा एक मोठा प्रश्न प्रवाशांसमोर होता. त्यामुळे प्रवाशांच्या सुचनेनुसार एसटी महामंडळाने आता ज्या आगाराची बस आहे, त्या आगार प्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण अथवा समस्या निर्माण झाली तर त्या समस्येचे किंवा तक्रारीचे निराकरण तातडीने व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान त्यांना एखादी अडचण आल्यास थेट तिथे प्रदर्शित केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अडचणीत अथवा समस्येचे निवारण तातडीने करावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. असे असले तरी बहुतांश अधिकारी, कर्मचारी, आगाराचे संपर्क क्रमांक हे नॉट रिचेबल किंवा संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे निदर्शनास आले.