पोळा, मारबत, गणेशोत्सव, ईद व शारदा उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करा -विवेक पाटील
🔺देवरी येथे सर्वधर्मीय शांतता समितीची बैठक संपन्न
देवरी ◾️ तालुक्यातील सर्वधर्मीयत शांतता समितीची बैठक पोलीस स्टेशन देवरी येथे पार पडली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी पोळा, मारबत, गणेशोत्सव, ईद व शारदा उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याचे आवाहन नागरिकांना केले. सामाजिक एकोपा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची सर्वांनी खबरदारी व जबाबदारी घ्यावी तसेच डीजे व ध्वनीप्रदुषण, वायुप्रदुषण टाळण्यावर भर देण्यात यावा असे त्यांनी देवरी पोलीस स्टेशन येथे आयोजीत सभेत सांगितले.
समाज प्रबोधन व सामाजिक ऐक्य या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. देवरी तालुका हा शांतताप्रिय तालुका असून येऊ घातलेले सर्व उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने आवाहन केल्याप्रमाणे पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहनही विवेक पाटील यांनी केले.
गणेशोत्सव व ईद हे सण सोबतच येत असल्यामुळे शांतता समितीच्या सदस्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राहील या अनुषंगाने मंडळाच्या सदस्यांनी जनजागृती करावी असे ते म्हणाले. प्रत्येक समाजाच्या भावनांचा आदर करणे आपले कर्तव्य असून या निमित्ताने सामाजिक एकोप्याचे दर्शन प्रत्येकाने घडविले पाहिजे असे ते म्हणाले. अनेक सण उत्सव एकाचवेळी आल्याने पोलीस यंत्रणेवरील ताण वाढणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे ते म्हणाले.
डीजे वर बंदी : सार्वजनिक गणेश मंडळाचे मिरवणुकीसाठी डीजे मालकांनी बुकिंग ऑर्डर्स घेऊ नये असे स्पष्ट आदेश यावेळी देण्यात आले.
अफवांवर विश्वास ठेवू नका:
उत्सवाच्या काळात समाज माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व खोट्या बातम्या काही लोक पसरविण्याची शक्यता असते. अशा पोस्ट खात्री केल्याशिवाय शेअर करू नका. कुणाच्या भावना दुखावतील व त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कृती आपल्या हातून घडू नये यासाठी नागरिकांनी सजग रहावे असे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील सभेद्वारे म्हणाले.
सदर बैठकित देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, देवरी स्टेशन चे ठाणेदार प्रविण डांगे , देवरी नगरपंचायतचे नगराअध्यक्ष संजु ऊईके, तालुक्यातील सर्व गणेश मंडळ व शाळेतील प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते.