चारही विधानसभा मतदार संघाला मतदान यंत्र सुपूर्द

गोंदिया⬛️ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील नविन प्रशासकीय इमारतीच्या गोदामात आज, 20 मार्च रोजी सिलबंद असलेल्या ईव्हीएम मशीन विधानसभा मतदार संघनिहाय वाटप करण्यात आल्या.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट वाटप करण्याकरीता आज सकाळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजकीय पक्षांच्या समक्ष जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांना मतदान यंत्र वाटप करण्यात आले. या मशीन पोलिस बंदोबस्तात चारही विधानसभा मतदारसंघात पोहचविण्यात येणार आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, गोंदियाचे उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे, सडक अर्जुनीचे तहसिलदार अक्षय पोयाम, आमगावचे तहसिलदार रविंद्र होळी, पोलिस उपनिरीक्षक अशोक कोरे, प्राचार्य डॉ. चंद्रहास गोळघाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नानू मुदलीयार, भाजपचे तिजेश गौतम, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रतिक लांजेवार व राघवेंद्रसिंह बैस, काँग्रेसचे राजकुमार पटले उपस्थित होते. लोकसभा क्षेत्रातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील 319 मतदान केंद्रासाठी 414 कंट्रोल युनिट, 414 बॅलेट युनिट व 446 व्हीव्हीपॅट मशिन देण्यात आले. तिरोडा विधानसभा मतदारसंघातील 296 मतदान केंद्रासाठी 384 कंट्रोल युनिट, 384 बॅलेट युनिट व 414 व्हीव्हीपॅट मशिन, गोंदिया विधानसभा मतदारसंघातील 362 मतदान केंद्रासाठी 470 कंट्रोल युनिट, 470 बॅलेट युनिट व 506 व्हीव्हीपॅट मशिन आणि आमगाव विधानसभा मतदारसंघातील 311 मतदान केंद्रासाठी 404 कंट्रोल, 404 बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट असे एकूण जिल्ह्यातील 1288 मतदान केंद्रासाठी 1672 कंट्रोल युनिट, 1672 बॅलेट युनिट व 1801 व्हीव्हीपॅट मशिन वाटप करण्यात आले.

Share