आम्ही विकासाच्या मुद्यावर भाजपसोबत : उपमुख्यमंत्री अजीत पवार

गोंदिया : आम्ही विकासाच्या मुद्यावर भाजपसोबत गेलो आहोत. काही लोक चुकीचा प्रचार करतात, त्याकडे दुर्लक्ष करायचे आहे. लोकसभा जागेचा निर्णय दोन दिवसात घेणार आहोत. महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आणून देशाच्या विकासाकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले.

ते सडक अर्जुनी येथे आज 7 मार्च रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोंदिया-भंडारा जिल्हा कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्यात बोलत होते. मंचावर खासदार प्रफुल्ल पटेल, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगडाले, भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासह भंडारा-गोंदियाच्या विकासाकरीता प्रफुल्ल पटेलांना पुन्हा सहा वर्षाकरीता राज्यसभेत पाठवले आहे. आम्ही वचनपूर्ती करणारे आहोत घोषणापूर्तीवाले नाहीत.

धान उत्पादक शेतकर्‍यांना बोनसच्या स्वरुपात मदत म्हणून 20 हजाराची मदत जाहीर केली होती, त्या पोटीची दीडहजार कोटीची रक्कम आजच सर्व जिल्ह्यांना वितरीत करण्यात आले आहे. विदर्भातील सिंचनाचा बॅकलाग पूर्ण करण्याकरीता अर्थसंकल्पात 2 हजार कोटीची तरतूद केली आहे. सिंचन प्रकल्प असो की रस्त्याची कामे यात शेतजमीन जात असेल तर आता रेडीरेकनरच्या तीनपट पैसा शेतजमीन गेलेल्यांना देण्याच्या निर्णय घेतला असल्याचे सांगून ते म्हणाले, अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील उमरझरी, मुरदोली सिंचन प्रकल्पाचे कागदपत्रे निवडणुकीपूर्वी तयार करा, या प्रकल्पासाठी पूर्ण निधी तसेच गोंदिया-मुंबई विमानसेवा सुध्दा सुरु करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

Share