12 दुचाकी चोरणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
गोंदिया: स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकाने 16 डिसेंबर रोजी भंडारा, गोंदिया व नागपूर येथून चोरी केलेल्या 12 दुचाकीसह सराईत आरोपीला ताब्यात घेतले. राहुल ऊर्फ चंगा लिल्हारे रा. अंगुर बगीचा गोंदिया असे आरोपीचे नाव आहे. जिल्ह्यात होणार्या दुचाकी चोरी प्रकरणाचा शोध घेताना स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकाला तिरोडा येथील दुचाकी चोरी प्रकरणी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल ऊर्फ चंगा लिल्हारे याला भंडारा जिल्ह्यातील बाम्हणी येथून ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान त्याने नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून 12 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी विना क्रमांकाच्या व 4 लाख 88 हजार रुपयांच्या 12 दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, सपोनि विजय शिंदे, पोउपनि महेश विघ्ने, वनिता सायकर, पोहवा राजू मिश्रा, महेश मेहर, भुवन देशमुख, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्र तूरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, सुजीत हलमारे, लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, संतोष केदार, पोलीस निरीक्षक, देविदास कठाडे, पोउपनि पुंडे, पोहवा दीपक खांडेकर, पोशि शैलेश दमाहे यांनी केली.