देवरी येथे चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटले
■ आठ आरोपी पसार
■ देवरी येथील अग्रसेन चौकातील घटना.
■ आरोपींचा शोध सुरु
देवरी : शहरातील अग्रसेन चौकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचालकास चाकू दाखवून त्याच्याकडील ८ हजार ३०० लुटल्याची घटना बुधवारी (ता. २३आगस्ट) रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणातील आठ आरोपी फरार असून, त्यांचा शोध देवरी पोलिस घेत आहेत.
सविस्तर असे की, अमरावतीवरून देवरी येथे व्यापाऱ्यांचे खत घून आलेला ट्रक क्रमांक एमएच २६, डीई ७९०६ हा सायंकाळी ६ वाजेपासून अग्रसेन चौकात उभा करून ठेवला मोता.ट्रकचालक फिरोजखा गुलाम हुसेन खान (३८) हा रात्री १० वाजता जेवण करीत होता. ट्रकमध्ये पिण्याचे पाणी नसल्याने त्याने आपल्या भावाला पाणी आणण्यासाठी हॉटेलमध्ये पाठविले. तो ट्रकच्या केबिनमध्ये बसून जेवण करीत होता. दरम्यान, अज्ञात चार युवक हे ट्रकमध्ये शिरले, त्यांच्या तोंडावर काळा रुमाल बांधलेला होता. त्यांनी चाकूचा धाक दाखवीत ट्रकचालकास तुझ्याजवळ किती पैसे आहेत, ते दे नाहीतर तुझा मर्डर करू, असे धमकावले. ट्रकचालकाने आपल्याजवळील २,८०० रुपये त्या अज्ञात युवकांना दिले, तर दुसऱ्या चार युवकांनी त्याच्याजवळील ट्रक ची चावी हिसकावली व ट्रक चालवीत देवरीवरून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भर्रेगाव फाट्याजवळून त्यांनी ट्रक देवरीच्या दिशेने वळविला.
तिथे ट्रक थांबवीला आणि त्यांनी चालकाला आपल्या भावाला फोन करण्यास सांगितले, तर चालकाने त्याचा भाऊ जो देवरीमध्ये उभा होता, त्याला फोन केला. तुझ्याजवळ आलेल्या व्यक्तींना तुझ्या जवळचे पैसे देऊन टाक, नाहीतर हे मला मारून टाकतील, असे सांगितले. या चोरट्यांचे दुसऱ्या चार साथीदारांनी चालकाचा भाऊ नदीम खान जो देवरीला उभा होता त्याला धमकावून त्याच्याजवळून पाच हजार पाचशे रुपये हिसकावून नेले. नंतर ते चारही जण पांढऱ्या रंगाच्या कारने ट्रकजवळ आले व आपल्या साथीदारांना घेऊन देवरीच्या दिशेने पसार झाले.