मंत्रालयामध्ये पैसे दिल्याशिवाय फाईल हलत नाही : माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राज्य सरकारवर घणाघात
Gondia : मंत्रालयामध्ये पैसे दिल्याशिवाय फाईल हलत नाही असा आरोप माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केला आहे. गोंदिया येथील विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या 16 एप्रिल ला नागपूर मध्ये महाविकास आघाडी सरकारची वज्रमुठ सभा आहे. यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी गोंदियात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक थांबविण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
विदर्भ महाविकास आघाडी सरकारचा गढ आहे : विजय वडेट्टीवार ◼️विदर्भ हा महाविकास आघाडी सरकारचाच गढ आहे. सर्वात जास्त आमदार आमचे आहेत. शिक्षक मतदारसंघात आमची सत्ता आहे. नागपूर जिल्हा परिषद आम्ही एक हाती जिंकली आहे. त्यामुळे विदर्भ हा भाजपचा गढ नसून महाविकास आघाडीचा गढ आहे असे वक्तव्य माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
तर या संदर्भात भाजपचे माजी मंत्री परीणय फुके हे गोंदिया मध्ये एका खाजगी कार्यक्रमात आले असता त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी विदर्भ हा भाजपचाच गढ आहे असे सांगितले, तर त्यांनी पुढे महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर देखील मिस्कील टिप्पणी केली असून ही वज्रमूठ सुटलेली आहे. याची दोन बोट एकीकडे, दोन बोट दुसरीकडे तर अंगठा कुण्या तिसरीकडे जात असल्याचे देखील ते म्हणाले.