भरधाव कार उलटून 19 वर्षीय तरुण जागीच ठार
अर्जुनी मोर: भरधाव कार शेतात पलटून 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू व चालक जखमी झाला. ही घटना सोमवार, 3 एप्रिल रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास नवेगावबांध मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ घडली. डेव्हिड धनराज रहिले (रा.इंजोरी, ह.मु.अर्जुनी मोर) असे मृतकाचे नाव आहे.
डेव्हिड रहिले हा नागपूर येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तीन दिवसापूर्वी तो अर्जुनी मोरगावला आला होता. सोमवारी सकाळी तो आपला मित्र वैभव उमेश राजाभोज याला घेऊन कारने नवेगावबांध येथे फिरण्यासाठी निघाला. उमेश राजाभोज हा कार चालवित होता. दरम्यान नवेगावबांध मार्गावरील मॉ. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन पुढे निघाले. मात्र कार भरधाव चालविण्याच्या नादात नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याशेजारील दिशादर्शक फलकावर आदळून शेजारील शेतात पलटली. हा अपघात एवढा भीषण होता की, डेव्हिड रहिला हा जवळपास 100 फूट दूर अंतरावर फेकल्या गेला व कारचा चुराडा झाला. यात डेव्हिडचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश राजाभोज जखमी झाला. अर्जुनी मोर. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेले. डेव्हिडच्या मृतदेहावर त्याच्या मूळगाव इंजोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. पुढील तपास अर्जुनी मोर. पोलिस करीत आहेत.