प्रतापगड यात्रेसाठी जिल्हा व पोलीस प्रशासन सज्ज , जाणून घ्या मार्गाबद्दल

गोंदिया: प्रतापगड येथे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात्रेतील भाविकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा त्यांची गैरसोय झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पोलिस अधीक्षक, गोंदिया यांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे. यात्रेदरम्यान सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांच्या जीवितास धोका होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता प्रतापगड येथील महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने १८ ते २३ फेब्रुवारीपर्यंत ९ वाजेपर्यंत सुकळी फाट्याकडून प्रतापगड येथे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना परत सुकळी फाट्याकडून जाण्याबाबत तात्पुरते मनाई आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

प्रतापगड येथे १८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येतात. या ठिकाणी भाविकांची व त्यांच्या वाहनांची प्रचंड गर्दी होते. या ठिकाणी वाहतुकीसाठी असलेला रस्ता हा अरुंद असल्याने त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने वाहतुकीच्या मार्गात तात्पुरता बदल केला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविक वाहनचालकांनी काळजी घ्यावी.

◼️अशी होणार वाहतूक

■ यात्रेच्या कालावधीत वाहने प्रतापगड येथून परत जाते वेळी प्रतापगड टी पॉइंट- गोठणगाव या मार्गाने वळविण्याचे आदेश जारी करण्यात येत आहेत. उपरोक्त आदेशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, गोदिया यांनी प्रभारी अधिकारी, पो.स्टे. केशोरी, गोंदिया यांच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी सूचनात्मक वाहतूक चिन्हे, बोर्ड लावून घ्यावेत, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. ही अधिसूचना १८ ते २३ फेब्रुवारी, ९ वाजेपर्यंत अमलात येईल.

Share