मनरेगा योजनेत गोंदिया जिल्ह्याने पूर्ण केले 114 टक्के उद्दिष्ट
गोंदिया◼️महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2022 पासून आतापर्यंत एकूण 214 कोटी 51 लाख 287 रुपये निधी खर्च झाला. त्यामधून 58 लक्ष 4 हजार मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. 50.68 लक्ष मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट असतांना जिल्ह्यात आजअखेर 114.52 उद्दिष्ट साध्य झाले आहे.
जिल्ह्याने सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिर, गुरांचा गोठा, शौचालय बांधकाम, घरकूल बांधकाम, शेळ्यांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, नॉडेप खत, गांडूळ खत निर्मितीसाठी टाकी तसेच पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी शोषखड्डे इत्यादी कामांचे नियोजन केले. त्यानुसार लेबर बजेटच्या लक्षांक 50 लक्ष 68 हजार मनुष्य दिवसनुसार 58 लक्ष 4 हजार मनुष्य दिवस उद्दिष्ट साध्य केले आहे. या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण 8 हजार 274 कामे सुरु करण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 657 कामे पूर्ण करण्यात आली असून 50.68 लक्ष मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लेबर बजेटचे उद्दिष्टाप्रमाणे आजअखेर 114.52 उद्दिष्ट साध्य झाले आहे.
या आर्थिक वर्षात 1 लाख 72 हजार 383 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आला आहे. त्यापैकी 6 हजार 303 कुटूंबांना शंभर दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कामाचा नियोजन आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कामे सुरु करुन जास्तीत जास्त कुटुंबांना शंभर दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सध्या जिल्हयात सेल्फवर 9 हजार 746 कामे आहेत.