भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारांना चिरडले | एक ठार तर एक गंभीर

मोरगाव चौकात दुचाकीस्वारांना चिरडले

अर्जुनी-मोरगाव 20 : वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील मोरगाव चौकात भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारांना चिरडले. यात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज बुधवार, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडला.

दुचाकीस्वारांना चिरडले

चारचाकी वाहनाने दुचाकीस्वारांना चिरडले. त्यानंतर दुचाकीवरील दोन्ही गंभीर जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा येथे हलविण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यु झाला. विशाल देवीदास नाकाडे (वय 18) असे मृतकाचे नाव आहे. तर दुसरा गंभीर जखमी हा ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोरगाव येथे उपचार घेत आहे. 

घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, सुजुकी सेलेरियो एमएच 35, एजी-4251 क्रमांकाच्या चारचाकीने जनबंधू कुटुंब खामखुऱ्यावरून गोंदियाला जात होते. दरम्यान महागाववरून ताडगाव येथे जाणारे समीर माधव नाकाडे (वय 18) व विशाल देविदास नाकाडे (वय 17) रा. ताडगाव हे होंडा कंपनीच्या एमएच 35, एक्स-6218 या क्रमांकाच्या दुचाकीने ताडगावला परत येत होते. दोन्ही वाहने आपापल्या दिशेने भरधाव येत होते. दरम्यान राज्यमार्गावरील मोरगाव चौकात दोन्ही वाहनांची टक्कर झाली. 

ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीला चारचाकीने जवळपास 70 फूटपर्यंत फरफटत नेले. या अपघातात दुचाकीस्वारांची स्थिती गंभीर होती. दोघांनाही स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशाल नाकाडे यांची स्थिती गंभीर असल्याने त्याला भंडारा येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला नागपूरला नेण्यात येत होते. दरम्यान दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

यामध्ये चारचाकी वाहनातील जनबंधू कुटुंब सुरक्षित आहे. मात्र चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान चौकामध्ये शेकडोंच्या संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास अर्जुनी-मोरगाव पोलीस करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share