शैक्षणिक सत्रात पहिली, दुसरीची पुस्तके बदलणार

गोंदिया : शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी तसेच साठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ (जून २०२४) हे इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे इयत्ता पहिली – दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ (जून २०२३) पासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण ४ भागात उपलब्ध करून दिली आहेत. या वर्षी सुध्दा तशाच पद्धतीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ (जून २०२४) पासून राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित व अंशतः अनुदानित तसेच खाजगी व विना अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

आवश्यकतेनुसार वह्यांची पृष्ठे समाविष्ट

या पाठ्यपुस्तकांमध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वह्यांची पृष्ठे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी एकूण दहा माध्यम व सेमी इंग्रजी विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील, असे कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Share