घोटाळा: खोट्या दस्तावेजावर घरकुल मंजूर

◾️सुमारे ४० वर्षांपासून गावात वास्तव्य नसलेल्या महिलेला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर होऊन दोनदा अनुदान उचल

अर्जुनी मोरगाव: ४० वर्षांपासून गावात वास्तव्य नसलेल्या महिलेला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर होऊन दोनदा अनुदान उचल केल्याची घटना सुकळी खैरी ग्रामपंचायतीमध्ये घडली. यात दोषी असलेल्या ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर व परिचरावर कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

सुकळी ग्रामपंचायत अंतर्गत सुकळी, खैरी व बोळदे ही गावे समाविष्ट आहेत. मौजा बोळदे येथील मूळ रहिवासी गीता शामराव नंदेश्वर या सुमारे ४० वर्षांपासून नागपूर येथे वास्तव्यास आहेत. सुकळी ग्रामपंचायतीचा संगणक ऑपरेटर हा त्यांचा नातेवाईक आहे. त्याने गीता यांच्या घरकुल मंजुरीसाठी काही दस्तावेज गीता यांच्याकडून, तर काही बनावट तयार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. घरकुल प्रस्तावामध्ये सरपंचाची स्वाक्षरी असलेला दि.२१ जानेवारी रोजी दिलेला रहिवासी दाखला जोडला आहे. नागपूरच्या भारतीय स्टेट बँक कपिलनगर शाखेची खातेपुस्तिका जोडली आहे. आधारकार्डवर नागपूरचा पत्ता आहे. या महिलेच्या नावे बोळदे गावात रेशनकार्ड नाही. मतदान यादीत नाव समाविष्ट नाही असे ग्रामस्थांनी आरोप केले आहेत. ज्या लोकांना घरकुलची खरी गरज आहे, त्यांना लाभ मिळत नाही. मात्र, कर्मचारी हे पैसे घेऊन बनावट दस्तावेज तयार करून देतात त्यांना लाभ मिळतो. गावातील काही मृत व्यक्तींच्या नावेसुद्धा लाभ देण्यात आल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. संगणक ऑपरेटर व परिचराची चौकशी करून त्यांना तातडीने कामावरून कमी करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिला आहे. याची गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share