गोंदिया जिल्हातील 182 ग्रामपंचायतींचा पथदिवे वीज पुरवठा खंडीत

गोंदिया: महावितरणवर थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असल्याने डबघाईस येण्याच्या मार्गावर आहे. महावितरणकडून वसुली मोहिम राबविण्यात येत असूनही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच जिल्ह्यातील 182 ग्राम पंचायतींवर पथ दिवे विज बिलाचे 2 कोटी 84 लाख 6 हजार 198 रुपये थकीत असल्याचे समोर आले आहे. यामुळे या गावातील पथदिव्यांचा विज पुरवठा Street lights खंडीत करण्यात आला आहे.

विज पुरवठ्याअभावी पावसाळ्यात ग्रामीणांची चांगलीच कोंडी होणार आहे. गावात लावण्यात येणार्‍या पथदिव्यांचा विज बिलांचा प्रश्न मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. गावातील पथदिव्यांचा विज बिल जिल्हा परिषदेकडून भरण्यात येत होते. मात्र, शासनाने यावर बंदी आणली. त्यामुळे विज बिल भरणे ग्रामपंचायतीला भाग पडले. परंतु, महिन्याकाठी येणारा भरमसाठ विज बिलाने ग्रामपंचायतीने गणित बिघडविले आणि थकीत बिल वाढत गेला. त्यातही विज बिल भरणा करणे ग्रामपंचायतींना अशक्य होत असल्याने कोंडी निर्माण झाली. या सर्व प्रकारावर शासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. दुसरीकडे महावितरणकडून बिल वसुली न झाल्याने 182 ग्रामपंचायतीतील पथदिव्यांचा विज पुरवठा खंडीत करण्यात आला. पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या 182 ग्रामपंचायतीवर महावितरणचे 2 कोटी 84 लाख 6 हजार 198 रुपये थकीत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर गावे अंधारात राहणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेला किटक, सरपटणार्‍या प्राण्यांचा धोका नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत गावकर्‍यांची चांगलीच कोंडी होणार आहे.

Share