राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू,जीन्स टी-शर्टवर बंदी
मुंबई 11: – आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला असून कोणते आणि कसे कपडे सरकारी कार्यालयात घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करत नसल्यामुळे जनमानसातील सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलीन होते.
एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची असते. जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा अशा परिस्थितीत ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याच्या एकंदरीत कामकाजावरही त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होतो. या सर्व बाबी विचारात घेता मंत्रायलय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत. तसेच जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये.
सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपडे परिधान करावे.
कार्यालयामध्ये महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.
स्लिपरचा वापर कार्यालयामध्ये करू नये
सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेले कपडे हे व्यवस्थित असावे. जसे महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा.
पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा.
परिधान केलेले कपडे स्वच्छ व नीटनेटके असावे याची दक्षता घ्यावी.