गोंदिया: लसीकरणात जिल्ह्याचा 9 लाखांचा टप्पा पार

गोंदिया 17: नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे, यादृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न असून, यातूनच आता जिल्ह्याने 9 लाखांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील 9,18,418 नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची टक्केवारी 70% एवढी आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे यात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमीच असून, ही संख्या वाढविण्यावर आरोग्य विभागाचा लक्ष आहे.

लसीकरणाच्या सुरूवातीपासूनच जिल्हा अग्रेसर राहिला आहे. विशेष म्हणजे 18-44वर्ष वयोगटाला परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाला आणखीन गती मिळाली आहे. शिवाय जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले पाहिजे, यासाठी आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. यामुळेही लसीकरणाला गती मिळाली आहे. याचेच फलित आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत 918418 नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची टक्केवारी 70% एवढी आहे. यामध्ये पहिला डोस घेणारे 681713 नागरिक असून, त्यांची टक्केवारी 52% एवढी आहे तर दुसरा डोस घेणारे 236696 नागरिक असून, त्यांची टक्केवारी 81% एवढी आहे.

दुसरा डोस वेळेवर घ्या :

मुदत संपूनही जिल्ह्यातील दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी त्यांचा दुसरा डोस घेतलेला नाही. आता त्यांना कोरोना गेल्यासारखे वाटत असून, ते दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र कोरोना गेला नसून, दुसरा डोस घेतल्याशिवाय आपण पूर्णपणे सुरक्षित नाही, हे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी वेळेवर दुसरा डोस घ्या, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी केले आहे.

Share