दुसऱ्या दिवशीही सभागृहात पुन्हा राडा : आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला

वृत्तसंस्था / मुंबई : पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी सुद्धा भाजपच्या आमदारांनी तुफान राडा घातला आहे. विधानभवनाच्या बाहेर भाजपकडून आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील राजदंड पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.

भाजपचे आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना बडनेराचे आमदार रवी राणा यांनी सभागृहात काळा बोर्ड घेऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर राजदंड घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी भास्कर जाधव आणि रवी राणा यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मार्शलला बोलावून भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले.
राजदंड पळवण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले नाही. कामकाज सुरूच ठेवण्यात आले होते.

Share