वीज कोसळली ? १८ हत्तींचा मृत्यु ; आसाम मधील ह्रदयद्रावक घटना

वृत्तसंस्था

गुवाहाटी : वादळी पावसात वीज कोसळल्याने नियोजित अभयारण्यातील १८ जंगली हत्तींचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार हत्ती वीज कोसळून मरण पावल्याचे दिसत असले तरी त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि मरण पावलेल्या हत्तीची नेमकी संख्या समजण्यासाठी परिसराची पाहणी केली जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पोस्टमॉर्टम अहवालातून मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा खुलासा होईल.

आसामच्या नौगावमध्ये एका डोंगरावर गुरुवारी १८ हत्तींचा मृत्यू झाला . वन विभागाने येथे तपास सुरू केला आणि असे समजले की, वीज कोसळल्यामुळे जंगली हत्तीचा मृत्यू झाला आहे आसामचे मुख्य वन संरक्षक अमित सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी कठियाटोली रेंजच्या कुंडोली वनक्षेत्रात डोंगराळ भागात घडली. १८ हत्तींचे मृतदेह हे वेगवेगळ्या जागी सापडले.

मुख्य वन संरक्षक अमित सहाय म्हणाले की, एका जागेवर चार आणि दुसऱ्या जागेवर १४ अन्य हत्तीचे मृतदेह सापडले. हत्तींचा मृत्यू वीज कोसळून झाल्याचे सुरुवातीचा तपासात समजले. वनविभागाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पशुवैद्यकीयांना घटनास्थळी नेण्यात आले आहे.

नौगाव जिल्ह्याचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि डीएफओ (जिल्हा वन अधिकारी) यांना या भागात पाठविण्यात आले आहे. १८ हत्तींच्या मृत्यू कारण शोधण्यासाठी त्यांना चौकशी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे, असे अमित सहाय यांनी सांगितले.

कठियाटोली वनक्षेत्रात वीज कोसळल्याने १८ हत्तींच्या मृत्यूबद्दल आसामाचे वनमंत्री परिमल शुक्लाबैद्य यांनी शोक व्यक्त केला आहे. शुक्लाबैद्य म्हणाले की, आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पीसीसीएफ (वन्यजीव) आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती मंत्री शुक्लवैद्य यांनी दिली.

Share