कोविड हॉस्पिटल्सची शहानिशा न करताच ‘NOC’प्रमाणपत्रे

विरार रुग्णालय आग दुर्घटना प्रकरणाची गुन्हे शाखेकडून चौकशी; अग्निशमन विभागाकडून नियमांची पायमल्ली

वृत्तसंस्था : विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटना प्रकरणात गुन्हे शाखेकडून केलेल्या चौकशीत पालिकेच्या अग्निशमन विभागाचे पितळ उघडे पडले आहे. विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विभागाने सर्वोच्च न्यायालयांच्या नियमांची पायमल्ली केली असून कोविड रुग्णालयांना कसलीही शहानिशा न करताच ‘ना हरकत दाखले’ देण्यात आल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.

मागील आठवडय़ात शुक्रवारी विरारच्या विजयवल्लभ या खासगी कोविड रुग्णालयाला आग लागली होती. या  दुर्घटनेची चौकशी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.   चौकशीमध्ये पालिकेच्या अग्निशमन विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. गुन्हे शाखेतर्फे आग दुर्घटनेसाठी कोण जबाबदार आहे ते निश्चित केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२० मध्ये निर्णय देताना दर महिन्याला सर्व कोविड रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र वसई-विरार महापालिकेचा अग्निशमन विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याचे पोलिसांनी सांगितले.  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एखाद्या कायद्याप्रमाणे असतो. पण पालिकेला अशा आदेशाबद्दल काहीच माहिती नसल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालिकेने शहरातील आस्थापनांना किती अग्निसुरक्षेच्या किती नोटिसा पाठवल्या? त्या खरोखर पाठवल्या का? ते तपासले जाणार आहे. रुग्णालय आणि इतर आस्थापनांनी अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केले नसेल तर अग्निशमन विभागाने त्यांच्यावर कारवाई का केली नाही, हे देखील पोलीस पुढील तपासात पालिकेला विचारणार आहे. पालिकेने शहरातील विविध आस्थापनांना ‘ना हरकत दाखले’ दिले आहेत. परंतु हे ना हरकत दाखलेच कसलीही शहानिशा आणि पडताळणी न करता दिल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. पालिकेच्या ना हरकत दाखल्यात काय करावे याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु निर्देश देणे वेगळे आणि नियमांचे पालन केल्यानंतर दाखला देणे वेगळे हे दोन वेगळे प्रकार आहेत. परंतु पालिकेने निर्देशांना ना हरकत दाखला बनवला आहे. हा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले. एका रुग्णालयाला आग लागली आहे, मात्र अग्निशमन विभागाच्या या हलगर्जीपणामुळे शहरातील सर्वच आस्थापनांना आगीचा धोका निर्माण झाल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.

दोनही डॉक्टरांना न्यायालयीन कोठडी

आग दुर्घटनेप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेले रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. दिलीप शाह आणि डॉ. शैलेश पाठक यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share