
गोंदिया : दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. एकूण १७ पुरस्कारासाठी १५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. जिल्हा निवड समितीच्या वतीने त्यातील १० शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जि.प. शिक्षण विभागाकडून १५ सप्टेंबर रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. निवड करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये माध्यमिक विभागातील फक्त २ शिक्षकांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांकडून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यातयेते. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागातून तालुकानिहाय प्रत्येकी एक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी एक महिला शिक्षकेची निवड केली जाते. असे एकूण १७ पुरस्कार शिक्षकांना प्रदान केले जातात. मात्र गेल्या काही वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्काराकडे जिल्हातील शिक्षकांनी पाठ फरविली आहे. त्यामुळे पुरस्काराच्या स्पर्धेसाठी हव्या तेवढ्या प्रमाणात प्रस्ताव सादर केले जात नाही. प्राथमिक विभागातून १२ तर माध्यमिक विभागातून फक्त ४ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्याच प्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले एकमेव प्रस्ताव जिल्हा परिषदकडे प्राप्त झाले होते. जिल्हा निवड समितीपुढे प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मांडण्यात आले. दरम्यान माध्यमिक विभागातील २ प्रस्ताव ठरलेल्या निकषाप्रमाणे नसल्यामुळे त्या प्रस्तावांना निवड प्रक्रियेपासून बाद करण्यात आले. तसेच प्राथमिक विभागातील ७ शिक्षकांची तर माध्यमिक विभागातील २ शिक्षकांची तसेच रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारसाठी एक महिला शिक्षकेची निवड करण्यात आली. एकूण १० शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सत्कार सोहळा कार्यक्रम पुढे ढकण्यात आला आहे. १५ सप्टेंबर रोजी जि. प. च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवड झालेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी: प्राथमिक विभाग- सुनिल हरिणखेडे (आमगाव), कु. वर्षा वालदे (देवरी), मोहन बिसेन (गोरेगाव), सौ. ममता येडे (गोंदिया), सौ. सुकवंता बनोटे (सालेकसा), कैलाश कुसराम (सडक अर्जुनी), दुर्योधन शेंद्रे (तिरोडा) माध्यमिक विभाग- सुभाष मारवाडे (गोरेगाव), गोकुलसिंह परदेशी (सालेकसा) तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी कु. प्रतिमा खोब्रागडे (तिरोडा) हे शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.








