गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत यावरून धुसफुस आणि वाद कायम आहे. नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा पेच अद्यापही कायम आहे. तर याच वादाची झळ आता विदर्भातील गोंदिया जिल्ह्यालाही बसली आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाला कोण कुठे ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली. गोंदियाला ध्वजारोहणाची जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु त्यांनी त्यास नकार दिल्याने आता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी ध्वजारोहण केला.
मंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे असल्याने त्यांना तेथे ध्वजारोहण करण्याची इच्छा होती. पण तो मान भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज असल्याचे बोलल्या जाते. एकूणच पालकमंत्री पदावरून महायुतीत मतभेद उफाळून आले असल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचेच मंत्री बाबासाहेब पाटील आहेत. पण त्याची प्रकृती ठीक नसल्याचे समजते. त्यामुळे गोंदियाची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली होती. पण त्यांनी याला स्पष्टपणे नकार दिल्याची माहिती आहे.
नाशिकचा मान न मिळाल्यानेच गोंदियास नकार
२०२७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होत असल्याने नाशिक पालकमंत्रिपदासाठी तिन्ही पक्ष दावा करत आहे. राज्य सरकारकडून नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांना देण्यात आल्याने शिवसेना नेते दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याची संधी न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांनी गोंदियामध्ये ध्वजारोहण करण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे.








