देवरी १५ जुलै : स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा लोकशाही पद्धतीने शालेय निवडणूक राबविण्यात आली. खऱ्या लोकशाहीचे धडे शालेय जीवनातच विध्यार्थ्यांच्या अंगी रुजावे आणि सुजाण तसेच कर्तव्य दक्ष लोकप्रतिनिधींची भूमिका विध्यार्थ्यांना कळावी. राजकीय आणि निवडणूक पद्धतीची जागरूकता शालेय जीवनातच व्हावी या उद्देशाने शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी सदर निवडणुकीचे आयोजन केले. या निवडणुकीमध्ये एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. सर्वांना चिन्हांचे वितरण करण्यात आले होते. सदर निवडणुकीची पूर्वतयारी विशेष निवडणूक अधिकारी नेमून करण्यात आलेली होती. ईव्हीएम मशीन ,बायलॉट पेपर, मतदान कक्ष, बोटावर शाही, गुप्त मतदान पद्धती, मतदान बूथ या पद्धतीची तयारी शालेय परिसरात करण्यात आलेली होती. शालेय वातावरण एखाद्या राजकीय निवडणुकी सारखे बघावयास मिळाले. सदर निवडणुकी मध्ये बूथ १ वर ९९ टक्के मतदान आणि बूथ २ वर १०० टक्के मतदान झाले. सदर निवडणूकी मध्ये शाळा प्रतिनिधी साठी मोनीत प्रमोद रोकडे आणि निया योगेंद्र तिवारी निवडून आले. मतदान प्रचारानंतर ही निवडणूक अधिकच चुरशीची झाली होती. सदर निवडणुकी मध्ये मोनित रोकडे याने १४९ मते मिळवून आणि निया तिवारी यांनी ८७ मते मिळवून आपला विजय पक्का केला. विशेष म्हणजे दरवर्षी प्रमाणे विजयी झालेल्या विध्यार्थ्यांना येणाऱ्या स्वातंत्र दिनी प्रमुख अतिथी आणि ध्वजारोहण करण्याचा मान मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्या मध्ये उत्सुकता बघावयास मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून राहुल मोहुर्ले, नामदेव अंबादे, नितेश लाडे, विश्वप्रित निकोडे, भोजराज तुरकर , सरिता थोटे , वैशाली मोहुर्ले,आकांक्षा डिब्बे रविना मुनेश्वर, तेजस्विनी नंदेश्वर यांनी भूमिका बजावली. सर्व शिक्षकांनी आपली मोलाची भूमिका बजावली. संस्थेचे अध्यक्षा अंकिता रूईया , सचिव निर्मल अग्रवाल आणि प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.








