देवरी:शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुराडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शैक्षणिक सत्र२०२५-२६ च्या पहिल्या दिवसाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्यक्रम संपन्न करून पार पडला.
या कार्यक्रमामध्ये आमदार संजय पुराम यांनी आपल्या हस्ते चिमुकल्या नवोगत बालगोपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करीत पहिल्या दिवशी वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना गुलदस्ते, टोप्या,पाटी- पुस्तके व शालेय साहित्य देऊन अतिशय जिव्हाळ्याने व आनंददायी पद्धतीने त्यांचे स्वागत केले. या विशेष कौतुकाने विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन उत्साह संचारला होता.
यावेळी आमदार संजय पुराम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय रहाणार नाही” असे सांगितले. या छोट्या बालकांमध्ये आपल्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या उज्वल भविष्य्याचे रहस्य दडलेले आहे.त्यांना चांगल्या शैक्षणिक सोयी सुविधा आणि प्रेरणा देणे ही आपल्या संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादनही केले.
याप्रसंगी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथील श्रृती लक्ष्मीशंकर मरकाम हिने निट परीक्षेत आल इंडीया ट्रायबल रॅंक ९५ प्राप्त केल्याबद्दल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आमदारांनी सत्कार केला,या कार्यक्रमाला देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे,जिल्हा परिषद सदस्या सविताताई पुराम, पंचायत समिती सदस्या ममताताई अंबादे,पुराड्याचे सरपंच लक्ष्मीशंकर मरकाम, केंद्र प्रमुख दशाराम लाळे,शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता भलावी तसेच संपूर्ण शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.








