11.25 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

गोंदिया: जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. चारही मतदार संघातील 11 लाख 25 हजार 100 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून विधानसभा निवडणूक भयमूक्त व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले. Gondia-Election 2024 ते येथील प्रशासकीय इमारतीतील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभा कक्षात सोमवार, 4 रोजी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. नायर पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात 4 नोव्हेंबरपर्यंत एकूण 11 लाख 25 हजार 100 मतदार आहेत. पैकी 5 लाख 53 हजार 685 पुरुष मतदार तर 5 लाख 71 हजार 405 स्त्री मतदार व 10 इतर मतदार आहेत. 

गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, तिरोडा व आमगाव या मतदार संघात एकूण 64 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अर्जुनी विधानसभा मतदारसंघात 19, तिरोडा 21, गोंदिया 15 व आमगाव विधानसभा मतदारसंघात 9 उमेदवार भाग्य अजमावत असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्ह्यात एकूण 1285 मतदान केंद्र राहतील. या प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार व 85 वर्ष अधिक वयोगटातील मतदारांकरीता मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. Gondia-Election 2024 मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध यंत्रणांच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल. जिल्ह्यात सेना दलातील मतदारांची संख्या (सर्व्हिस व्होटर) 1972 असल्याचे नायर यांनी सांगितले.

निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 10 आंतरराज्यीय चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आले आहे. निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन कार्यरत आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये. Gondia-Election 2024 सुजाण नागरिकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले. यावेळी निवडणूक निरीक्षक (सामान्य) मोहित बुंदास, गोंदियाचे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत उपस्थित होते.

Share