आयपीएल सट्ट्यावर धाड ; चौघांना अटक
भंडारा: सध्या सर्वत्र आयपीएल क्रिकेटचा ज्वर सुरू असून प्रत्येक क्रीडाप्रेमी हे सामने पाहताना दिसत आहेत. मात्र काही ठिकाणी सट्टा लावला जात असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले. संजय हंसराज साठवणे (30), वीरेंद्र भाविक कठाणे (33) दोघेही रा. गोवर्धन नगर, धर्मेंद्र श्यामलाल बनकर (21) रा. उमरवाडा, बाल्या उर्फ चक्रेशकुमार बिसने रा. तुमसर अशी आरोपींची नावे आहेत.
तुमसर शहरातील शिव मंदिर परिसरात नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात 5 मे रोजी आयपीएल सट्टाबाजार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारे रात्री 10 वाजता पोलिसांनी येथे धाड टाकली. यावेळी आयपीएल मॅचवर मोबाईलद्वारे पैशाची बाजी लावून लोकांकडून पैसे घेऊन आकडे उतरवून जुगाराचा खेळविताना चार आरोपी मिळून आले. त्यांच्याकडून मोबाईल, मोटार सायकल, रोख व इतर साहित्य असा 1 लाख 25 हजार 354 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्यावर तुमसर पोलिस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमर धंदर करीत आहेत.